स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

माझे मायबाप

माझे मायबाप


माझे मायबाप
किती साधे भोळे
जोडी त्यांच्यापरी
भेटणार कोठे ?

बाप माझा पहा
होता अडाणीच
कधी कधी चाले
ते अनवाणीच.

माय माझी तेव्हा
होती चौथी पास
सहा सहा पोरं
शिकविले खास.

केली सालदारी
त्यांनी ज्यांच्या घरी
त्यांचेच वावर
केले ठेक्यावरी.

विहीरीचे पाणी
ओढून काढून
घर चालविले
पाणीच विकून.

किती कष्ट केले
दोघांनी मिळून
एक दुसऱ्याची
साथ ती देऊन.

मायेला माझ्या हा
वाचनाचा ध्यास
म्हातार पणात
पुस्तक उशास.

मायबाप माझे
देव देवाहून
उपकार त्यांचे
ठेवतो जपून.

बाप माझा नामा
माय सत्यवती
कवेत तयांच्या
ममतेची प्रीती.

:- हरेशकुमार ना. खैरे
   काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment